दुर्गम भागातील पोलिसांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

Santosh Gaikwad November 15, 2023 08:53 PM


गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा पिपरी बुर्गी येथील  छावणीमध्ये आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवाळीचा सण आज साजरा केला. 


अतिदुर्गम भागात आपल्या जीवाची परवा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना यांच्याहस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना ओवाळून भाऊबीजेचा सणही साजरा केला. तुम्ही इथे प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावता त्यामुळेच आम्ही सुरक्षित राहतो, तुमच्या याच त्यागाची जाण असल्यानेच दिवाळीचा सण तुमच्यासोबत साजरा करण्यासाठी आलो असल्याचे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  


या कार्यक्रमाला स्थानिक आदिवासी बांधवांना देखील आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. या निमित्ताने तेथील महिला आणि लहान मुलांना कपडे, फराळ आणि भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या अतिदुर्गम भागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकल वाटप देखील  करण्यात आले. 


राज्य सरकार हे गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठीच इथे उद्योगधंदे यावेत यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून अजून मोठे उद्योग याठिकाणी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण, रोजगार, दळणवळण आणि इतर सोयीसुविधा वाढवून इतर जिल्ह्यांइतकाच गडचिरोली जिल्हा देखील विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा,  गडचिरोली परिक्षेत्र उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी किरण पांडव उपस्थित होते.