mumbai : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचा ६३ वा वर्धापनदिन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहामध्ये उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी युनियनचे अध्यक्ष माजी खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या कारकिर्दीतील युनियनच्या यशस्वी बँक-कर्मचारी चळवळीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी युनियनच्या अध्यक्षांसह सल्लागार व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शनपर भाषणात युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या युनियनमधील ३८ वर्षाच्या उल्लेखनीय वाटचालीचा लेखाजोगा मांडला. प्रत्येक कामगार लढ्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या आनंदराव अडसूळ यांनी बँक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न यशस्वीपणे तडीस नेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत ही चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी अनेक प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावली. दोनदा त्यांनी प्राणघातक हल्लेसुध्दा लीलया परतविले. एका हल्ल्यात त्यांचा गाडी चालक मृत्यू पावला. तरीही त्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या लढ्यात भ्रष्टाचारी तडजोड स्वीकारली नाही. कर्मचाऱ्यांसाठी लढतांना त्यांनी बँक हित सुध्दा जपले. प्रथम बँक नंतर कर्मचारी आणि त्यानंतर युनियन असे ध्येयनिष्ठ धोरण त्यांनी अंगिकारले. कर्मचारी व बँक यासाठी सामूहिक आंदोलने, त्याचबरोबर बँकेच्या वाढीसाठी तसेच त्या टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा त्यांचा धमाका विशेष भावतो. प्रतिवर्षी अनेकदा रक्तदान शिबीर, क्रीडा-कला-शैक्षणिक-सांस्कृतिक आदी समाजोपयोगी उपक्रम युनियनद्वारे साकारले आहेत. अध्यक्ष आनंदराव अडसूळ हे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्र छायेखाली तयार झालेले खंदे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांची विचारधारा व मार्गदर्शनाच्या बळावर त्यांची आजही वयाच्या ७५ व्या वर्षी दमदार वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी युनियनच्या नेत्रदीपक वाटचालीत युनियन सल्लागार,शिवसेना राष्ट्रीय सचिव, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे आणि इतर पदाधिकारी यांची साथ लाभत असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले कि सहकारी बँकांबाबत सध्याचे धोरण मोडीत काढणारे आहे. रिझर्व्ह बँकेने सहकार्याची भूमिका घेणे, गरजेचे आहे. सहकारी बँकांच्या एनपीएची तरतूद त्यांच्या नफ्यातून करावे लागते. तसे न होता राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे बुडीत कर्जाच्या तरतुदीचा काही भाग सरकारी कोषातून करण्याची मागणी अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केली. वर्धापनदिनानिमित्त युनियनच्या ‘सहकार एकजूट' त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. युनियनच्या पुरुष व महिला कबड्डी संघाचे टी शर्ट खेळाडूंना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. अध्यक्षांच्या संकल्पनेतून वर्धापन दिनी सभासद व पाल्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून संगीत कार्यक्रम बहरला. त्यामध्ये सभासद व त्यांच्या पाल्यांनी नृत्य, मिमिक्री, तसेच वादन सदर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमधील युनियनच्या हजारो सभासदांची उपस्थिती कार्यक्रमाला होती.