धारावी प्रकल्पही अदानी च्या घशात घालण्याचा डाव : भाई जगताप यांचा विधानपरिषदेत आरोप

Santosh Gaikwad July 27, 2023 06:22 PM


मुबई : धारावी प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला कमी किंमतीत दिल्याचा मुद्दयावरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत  उपस्थीत केला. देशातील बंदरे, विमानतळे अदानींच्या घशात सरकारने आधीच घातले आहेत. आता गरिबांची धारावी पण घालणार का? असा संताप  त्यांनी व्यक्त केला. अदानीचे नाव आले की राज्य आणि केंद्रातील सरकार नतमस्तक का होते? त्यांचे तळवे का चाटते ? अशा शब्दात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत टीका केली.  

 

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी २८९ च्या प्रस्तावाद्वारे  धारावीचा मुद्दा उपस्थित केला. पाच वर्षापुर्वीचा म्हणजे २०१८ ला धारावी प्रकल्प ७ हजार २०० कोटीला एका कंपनीला देण्यात आला होता. आता तोच प्रकल्प अदानीला ५ हजार ६९ कोटीला देण्यात आला आहे. धारावीत शेकडो छोटे उद्योग, लाखो नोकऱ्या आहेत. रेल्वेची जागाही मोठ्या प्रमाणात आहे, ती देखील त्यांना बहाल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधीच्या कंत्राटामध्ये या जागेचा समावेश नव्हता. शिवाय रेल्वेच्या जागेसाठी म्हाडाने ८०० कोटी भरलेले असतांनी ही जागा देखील अदानींच्या घशात घालण्याचा घाट घातला गेला आहे.


धारावीतील लाखो लोकांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. एअरपोर्टजवळ हा धारावीचा भाग येतो. जिथे ३ ते ५ चा एफएसआय आहे तिथे नियम डावलून अदानी ग्रुपला ८ ते १० चा एफएसआय देण्यात आल्याचा दावा देखील जगताप यांनी केला. यातून मिळणाऱ्या ५० टक्के टीडीआरमधून अरबो, खरबोंचा घोटाळा होणार आहे. मुंबईतील बिल्डरांना तो खरेदी करावा लागणार आहे. गरीब आणि सरकारी जागेचा व्यापार या माध्यमांतून मांडण्यात येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला.  स्थलांतरितांना ८ ते १० किलोमीटरमध्ये घरं दिली जाणार आहे, पण प्रत्यक्षात नियम ५ किलोमीटरचा आहे. या नव्या बदलामुळे धारावीतील माणूस मुंबई बाहेर म्हणजे नवी मुंबईत फेकला जाणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या विषयावर एक तासाची चर्चा द्या, अशी मागणी देखील जगताप यांनी केली. मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांनी सूचना अमान्य केली.