सरकार च्या वर्षपूर्तीवर काँग्रेसची टीका : पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट, महिला अत्याचारही वाढले !
Santosh Gaikwad
June 30, 2023 04:04 PM
मुंबई, दि. ३० जून : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यात २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ईडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई हे देशात महिलांसाठी सुरक्षित शहर असा नावलौकिक होता पण लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या हत्या वाढल्या आहेत, राज्यातील ४ हजारांपेक्षा जास्त महिला व मुली गायब झाल्या आहेत, पुण्यासारख्या शहरातही दिवसाढवळ्या मुलीवर कोयत्याने हल्ला होतो. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, सहा-सात विभागाचा कारभार, सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद व राजकीय साठमारीतून त्यांना गृहविभागाकडे लक्ष देता नाही. पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त, महिला अत्याचारही वाढले असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर हल्लाबोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, हे सरकार स्थापन करताना घेतले गेलेले सर्व निर्णय सुप्रीम कोर्टानेच चुकीचे ठरवले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन, आमदारांना ईडी, सीबीआयची भिती घालून ‘खोके’ देऊन सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकारच असंवैधानिक आहे पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ईडी सरकार खुर्चीला चिकटून बसले आहे. वर्षभरात या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही. अतिवृष्टी व गारपीटीने शेतकरी संकटात सापडला असताना सरकार मदतीची केवळ घोषणा करते पण एक दमडीही शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही. सोयाबीन, कांदा, कापूस, कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शिंदे सरकारच्या जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळातच राज्यात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दर १० तासाला एक आत्महत्या करत आहे.
महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नेहमीच आघाडीचे राज्य राहिले आहे, हा लौकीकही ईडी सरकारने घालवला आहे. वेदांता-फॉक्सकॉन सारखा १.५ लाख कोटी रुपयांची गुतंवणुक व १ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मितीचा प्रकल्प गुजरातला दिला. टाटा एअरबस प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क, मरिन अकॅडमी, हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. उद्योग राज्याबाहेर गेल्यामुळे २ लाखांपेक्षा जास्त रोजगारही गेले. राज्यातील ३५ लाख विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची तयारी करतात पण या परिक्षा वेळेवर होत नाहीत, सावळागोंधळ सुरु आहे. अधिकारी बनवण्याचे स्वप्न बाळगलेल्या गावखेड्यातील गरिब, सामान्य कुटुंबातील मुलांच्या भवितव्याशी खेळ सुरु आहे. ईडी सरकार हे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, दलित, वंचित विरोधी आहे. काम काहीही न करता केवळ इव्हेंटबाजी व जाहीरातबाजीवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु असून महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकार डिरेल (Derail) झाले आहे, जाहिरातबाजी करून सुराज्य येत नसते त्यासाठी जनतेच्या हिताचे काम करावे लागते असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.