मुंबई, दि. १ः मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील साफसफाई योग्य होत नाही, अशी कारण देत सामाजिक संस्थांकडून काम काढून घेत नव्या कंपन्यांना कंत्राट दिली. त्यासंदर्भात काढलेल्या निविदा आणि कंत्राटे तातडीने रद्द करणार अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानपरिषदेत केली.
मुंबई शहराची साफसपाई योग्य रित्या होत नाही, असे सांगत पालिकेने ४ वर्षांसाठी नव्या कंत्राटादाराची नियुक्ती केली. नव्या कंत्राटामुळे सुमारे ७५ हजार सफाई कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. १२०० कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे या निविदेला स्थगिती देण्याची मागणी विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला अनेक सदस्यांनी पाठिंबा देत, कंत्रटदारांच्या मनमानीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. बेरोजगार, सेवा, अपंग व महिला आणि महिला बचत गट अशा सुमारे २ ते अडीच हजार संस्था पडणार असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी लाड पागे समितीवरून सरकारला प्रश्न विचारला.
प्रभारी मंत्री सामंत यांनी त्यावर खुलासा केला. ते म्हणाले की, अधिसंख्य पदावरील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल,असे आश्वासन सामंत यांनी परिषदेत दिले. या बैठकीत सफाई कामगारांच्या विविध मुद्द्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.