डीएई बुध्दिबळ: गोपाळ सुर्वे, चंद्रशेखर तिवारी, दीपक वाईकरची विजयी सलामी
Santosh Sakpal
November 11, 2023 05:51 PM
MUMBAI : ३८ व्या डीएई स्पोर्ट्स व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ब्रीट आयोजित क्लासिक बुध्दिबळ स्पर्धेत गतविजेत्या गोपाळ सुर्वे, चंद्रशेखर तिवारी, दीपक वाईकर, बाबाहिरू पंधारे, रक्तिम दास आदींनी सलामीचे साखळी सामने जिंकले. इंग्लिश ओपनिंगने डावाची सुरुवात करणाऱ्या नारायण कार्लेला गतविजेत्या गोपाल सुर्वेने वजिराच्या सहाय्याने जोरदार हल्ले केले. परिणामी नारायण कार्लेला ३६ व्या चालीला शरणागती पत्करावी लागली. स्पर्धेचे उद्घाटन ब्रीटचे चीफ एक्झुक्युटीव्ह प्रदीप मुखर्जी, डीजीएम विजय कडवाड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, प्रमुख पंच सिध्देश ठिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
तुर्भे येथील ब्रीट सभागृहात सुरु झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत चंद्रशेखर तिवारीने राणीच्या सहाय्याने अप्रतिम डावपेच रचून कृष्णा दाणावाथला १५ व्या चालीला शह दिला. सहाव्या पटावर दीपक वाईकर विरुध्द गणेश शिंदे यामधील लढत तब्बल ५१ चालीपर्यंत रंगली. यांच्यामध्ये दीपक वाईकरने राणी व हत्तीच्या सहाय्याने गणेश शिंदेच्या राजावर मात केली. अन्य सामन्यात गतउपविजेत्या बाबाहिरू पंधारेने श्रध्दा केसरकरला, रक्तिम दासने परवीन मानेला, अनिलकुमार नाईकने योगेश पडवळला, अमित प्रभाळेने अमोद पाटीलला, धर्मवीर सिंगने मयुरकुमार भानुशालीला हरवून पहिला गुण वसूल केला. स्पर्धेला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभले आहे.