MUMBAI : ३८ व्या डीएई स्पोर्ट्स व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ब्रीट आयोजित क्लासिक बुध्दिबळ स्पर्धेत अपराजित रक्तिम दासने स्विस साखळी ५ सामन्यात सरस सरासरीसह ४ गुणांची नोंद केली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या पटावर किंग्ज गॅम्बिट पध्दतीच्या सामन्यात रक्तिम दासने गतउपविजेत्या बाबाहिरू पंधारेला बरोबरी करण्यास भाग पाडले. स्पर्धेत दीपक वाईकरने (४ गुण) द्वितीय, बाबाहिरू पंधारेने ( ४ गुण) तृतीय तर मयूरकुमार भानुशालीने ( ४ गुण) चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या-उपविजेत्यांना ब्रीटचे चीफ एक्झुक्युटीव्ह प्रदीप मुखर्जी यांनी गौरविले. यावेळी ब्रीटचे डीजीएम विजय कडवाड, जनरल मॅनेजर एन. जयचंद्रन, जनरल मॅनेजर रमाकांत साहू, ब्रीट स्टाफ क्लबचे जनरल सेक्रेटरी सी.बी. तिवारी व स्पोर्ट्सचे सेक्रेटरी उमा शेरी कुमार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.
तुर्भे येथील ब्रीट सभागृहात दुसऱ्या पटावर अपराजित दीपक वाईकरने अमित प्रभाळेविरुध्द फ्रेंच डिफेन्स पध्दतीने सावध खेळ केला. २५ व्या चालीअखेर दोघांनी डावात बरोबरी मान्य केली. तिसऱ्या पटावर मयुरकुमार भानुशालीने प्याद्याला राणीमध्ये रुपांतरीत करून ७१ व्या चालीला प्रवीण मानेच्या राजाला शह दिला. चौथ्या पटावर इटालियन ओपनिंगने सुरु झालेल्या सामन्यात चंद्रशेखर तिवारीने धर्मवीर सिंग विरुध्द आक्रमक खेळ करण्याच्या नादात ३४ व्या चालीला राणीची चाल रचताना घोडचूक केली. त्याचा पुरेपूर लाभ उठवीत धर्मवीर सिंगने (३.५ गुण) पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. स्पर्धेला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभले होते.