आयपीएल २०२३ चा ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकात २ विकेट्स गमावत २१३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर या धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जने या सामन्यात विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथर्व तायडे आणि लियाम लिविंगस्टोनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबला २० षटकात १९८ धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने या सामन्यात पंजाबवर १५ धावांनी विजय मिळवला.
पंजाबसाठी सलामीला उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने १९ चेंडूत २२ धावांची खेळी केली. परंतु, तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार शिखर धवनला तर भोपळाही फोडू दिला नाही. इशांत शर्माने पहिल्या चेंडूवर धवनला डक आऊट केलं आणि पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानंतर अथर्व तायडे आणि लियाम लिविंगस्टोनने दिल्लीच्या गोलंदाजांना धुव्वा उडवला आणि अर्धशतकी खेळी केली. तायडेनं ४२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ५५ धावांची खेळी साकारली. तर लियाम लिविंगस्टोनने ४८ चेंडूत ९ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीनं ९४ धावा कुटल्या. परंतु, लियामला पंजाब किंग्ज संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. दिल्लीसाठी इशान शर्मा आणि नॉर्कियाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर खलील अहमद आणि अक्षर पटेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.