दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल बाद फेरीत

Santosh sakpal April 10, 2023 03:03 PM

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रवेश केला. अष्टपैलू सुनील बांदवलकर, इसाकी मुत्तू, जय तामोरे यांच्या अप्रतिम खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य ग्लोबल हॉस्पिटलचा ५७ धावांनी पराभव करून साखळी अ गटात प्रथम स्थान पटकाविले. सलामीवीर दयानंद पाटील, महेश गोविलकर, कपिल गमरे यांनी ग्लोबल हॉस्पिटलतर्फे छान खेळ करून सामन्यात रंगत आणली. अष्टपैलू सुनील बांदवलकर व दयानंद पाटील यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन आयडियल ग्रुपचे सहसचिव राजन राणे व सत्कारमूर्ती क्रिकेटपटू चेतन सुर्वे यांनी गौरविले.


   शिवाजी पार्क मैदानात ग्लोबल हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. सलामीची जोडी लवकर फुटूनही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला इसाकी मुत्तू (२५ चेंडूत २७ धावा), जय तामोरे (२६ चेंडूत नाबाद २८ धावा), प्रफुल मारू (१५ चेंडूत १५ धावा), सुनील बांदवलकर (१७ चेंडूत १५ धावा) आदींनी मर्यादित २० षटकात ६ बाद १४६ धावांचा टप्पा गाठून दिला. दयानंद पाटीलने २३ धावांत २ बळी घेतले. सलामीवीर दयानंद पाटील (४० चेंडूत २६ धावा), महेश गोविलकर (२६ चेंडूत २३ धावा), कपिल गमरे (२१ चेंडूत २३ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी ग्लोबल हॉस्पिटलचा डाव मर्यादित २० षटकात ८ बाद ८९ धावसंख्येवर थोपविला. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने ५७ धावांनी शानदार विजय मिळविला. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.


******************************