मुंबई : अष्टपैलू कपिल गमरे, दयानंद पाटील, आशिष जाधव यांच्या अप्रतिम खेळामुळे ग्लोबल हॉस्पिटलने नवी मुंबईच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलचा ७ विकेटने पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पहिला साखळी सामना जिंकला. कप्तान संदीप देशमुखने सर्वाधिक ४१ धावा फटकावूनही केडीए हॉस्पिटल संघाला बाद फेरीतील स्थान गमवावे लागले. अष्टपैलू कपिल गमरे व संदीप देशमुख यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन आयडियल ग्रुपचे सल्लागार पी.व्ही. देसाई यांनी गौरविले.
ग्लोबल हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. अष्टपैलू कपिल गमरे (१४ धावांत २ बळी), आशिष जाधव (१९ धावांत ३ बळी), निलेश देशमुख (१५ धावांत २ बळी) व सुनील सकपाळ (१९ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलादाजीमुळे केडीए हॉस्पिटलचा डाव १९ व्या षटकाला १०० धावसंख्येवर संपुष्टात आला. केडीए हॉस्पिटल संघाला धावांचे शतक गाठून देतांना कप्तान संदीप देशमुखने (४१ चेंडूत ४१ धावा) दमदार फलंदाजी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर दयानंद पाटील (३५ चेंडूत ३० धावा) व कपिल गमरे (३० चेंडूत नाबाद २५ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. परिणामी ग्लोबल हॉस्पिटलने १६.४ षटकात ३ विकेटच्या मोबदल्यात विजयी १०१ धावसंख्या रचली. तत्पूर्वी शिवाजी पार्क मैदानात माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांना रुग्णालयीन क्रिकेटपटू व आयडियलतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कसोटीपटू व उच्च दर्जाचे प्रशिक्षक सुधीर नाईक यांनी सेवाभावीपणे दशकापूर्वी बदलापूरमधील चारशेहून अधिक युवा खेळाडूना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात मोफत मार्गदर्शन केल्याची आठवण अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांनी सांगितली.