MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कस्तुरबा हॉस्पिटलने प्रवेश केला. सलग दुसरा साखळी सामना जिंकताना कस्तुरबा हॉस्पिटलने कप्तान रोहन ख्रिस्तियनचा अष्टपैलू खेळ व महेश सणगरच्या आक्रमक फलंदाजीमुळे बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचा ६५ धावांनी पराभव केला. अष्टपैलू रोहन ख्रिस्तियन व नितेश म्हस्के यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी सुनील पाटील, क्रिकेटपटू मनोहर पाटेकर, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
शिवाजी पार्क मैदानात रहेजा हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून कस्तुरबा हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. कस्तुरबा हॉस्पिटलची सलामी जोडी १५ धावांवर तंबूत परतल्यावर महेश सणगर (४४ चेंडूत ४७ धावा) व रोहन जाधव (२० चेंडूत १७ धावा) जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यानंतर सहाव्या क्रमांकावरील रोहन ख्रिस्तियनने (२२ चेंडूत नाबाद ४० धावा) कप्तानपदास साजेशी फलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ८ बाद १३४ धावांचा टप्पा गाठला. अष्टपैलू संदीप पाटील (२६ धावांत २ बळी) व सत्कारमूर्ती चेतन सुर्वे (२५ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना रहेजा हॉस्पिटलची ३ बाद ७ धावा अशी निराशाजनक अवस्था रोहन ख्रिस्तियन (२ धावांत २ बळी), सुदर्शन गुत्ते (२८ धावांत २ बळी) व गोपाल मकवाना (१६ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने केली. परिणामी नितेश म्हस्के (१६ चेंडूत २९ धावा) व संदीप पाटील (१५ चेंडूत नाबाद १४ धावा) यांनी घसरता डाव सावरण्याचा प्रयत्न करूनही रहेजा हॉस्पिटलचा संघ १२.४ षटकात अवघ्या ६९ धावसंख्येवर गारद झाला. कस्तुरबा हॉस्पिटलने ६५ धावांनी शानदार विजय मिळवीत बाद फेरीतील स्थान निश्चित केले.