MENU

डॉ. हेगडे क्रिकेट स्पर्धेत हिरानंदानी, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विजेते

Santosh Sakpal June 07, 2024 07:25 AM


Mumbai -SHIVNER 

   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये हिरानंदानी हॉस्पिटलने ‘बी’ डिव्हिजनचे तर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविले. पावसामुळे ओलसर राहिलेल्या खेळपट्टीवर ‘बोल्ड आउट’ पध्दतीने अंतिम सामना शिवाजी पार्क मैदानात खेळविण्यात आला. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव, चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयीन क्रिकेटमधील उल्लेखनीय खेळाबद्दल सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला.


   बलाढ्य  सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द ‘बी’ डिव्हिजनच्या अजिंक्यपदाला गवसणी घालतांना हिरानंदानी हॉस्पिटलला दिनेश सोळंकी व प्रशांत देसाई यांची अचूक गोलंदाजी उपयुक्त ठरली. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या शुभम चव्हाणने एकमात्र त्रिफळा उडविला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजीचा पुरस्कार प्रतिक अंबोरे व तुषार राणे यांनी, उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार स्वप्नील शिंदे व विशाल सावंत यांनी तर सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा पुरस्कार सुशांत गुरवने पटकाविला.


    ‘सी’ डिव्हिजनमध्ये अष्टपैलू महेश सनगरने कस्तुरबा हॉस्पिटल संघाला उत्तम प्रारंभ करून देऊनही सुदेश यादव व निपूल वेलकर यांनी निर्णायक क्षणी उत्तम गोलंदाजी केली आणि ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला एका विकेटच्या फरकाने विजेतेपद मिळवून दिले. या विभागात उत्कृष्ट फलंदाजीचा पुरस्कार महेश सनगरने, उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार सुदेश यादवने तर सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा पुरस्कार करण मळेकरने मिळविला.



******************************