डॉ. हेगडे टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिरानंदानी हॉस्पिटलचा मोठा विजय

Santosh Sakpal June 03, 2024 04:14 PM

Mumbai -SHIVNER 

    आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे चषक आंतर हॉस्पिटल ‘बी’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिरानंदानी हॉस्पिटलने बलाढ्य कस्तुरबा हॉस्पिटल संघावर ८ विकेटने मोठा विजय मिळविला. सलामीवीर प्रतिक अंबोरे, तुषार राणे व अमोल शिरसाट यांची दमदार फलंदाजी हिरानंदानी हॉस्पिटलला विजयासाठी उपयुक्त ठरली. अर्धशतकवीर महेश सनगर व अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंढे यांनी कस्तुरबा हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अष्टपैलू प्रतिक अंबोरे व महेश सनगर यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार लायन्स गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला. स्पर्धेनिमित्त सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव यांचा विशेष गौरव होणार आहे.


   शिवाजी पार्क मैदानात हिरानंदानी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर महेश सनगरला (४४ चेंडूत ५५ धावा) कल्पेश भोसले (१६ चेंडूत १६ धावा), डॉ. परमेश्वर मुंढे (११ चेंडूत १२ धावा), रोहन जाधव (१३ चेंडूत १४ धावा) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटल संघाने मर्यादित षटकात ४ बाद १०७ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर तुषार राणे (२१ चेंडूत २४ धावा) व प्रतिक अंबोरे (२८ चेंडूत ३९ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी सातव्या षटकाला ६२ धावांची भक्कम सुरुवात हिरानंदानी हॉस्पिटलला करून दिली. त्यानंतर रुपेंद्र माने (११ चेंडूत नाबाद १३ धावा) व अमोल शिरसाट (१२ चेंडूत नाबाद १८ धावा) यांनी छान फलंदाजी केली. परिणामी हिरानंदानी हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १३.१ षटकात २ बाद १०८ धावा फटकावून सहज पार केले. फिरकी गोलंदाज डॉ. परमेश्वर मुंढे यांनी १९ धावांत २ बळी घेतले. तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सलामीवीर महेश सनगर (४३ चेंडूत नाबाद ६९ धावा), डॉ. परमेश्वर मुंढे (२५ चेंडूत नाबाद ३४ धावा), कल्पेश भोसले (१७ चेंडूत २७ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने १ बाद १५३ धावा फटकाविल्या आणि नवी मुंबईच्या केडीए हॉस्पिटलचा ५६ धावांनी पराभव केला होता. पराभूत संघाच्या यश जुंदळेने (२८ धावा व १ बळी) अष्टपैलू खेळ केला.          


******************************