भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भगवा हाती घेतला

Santosh Gaikwad June 24, 2024 08:07 PM




भंडारा, : भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार भोंडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरण आहे आणि पक्ष संघटन येणारा काळात मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. २०१९ साली पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिवसैनिक होते. त्यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाही. वर्षाचे 365 दिवस शिवसेना कार्य करत असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्याती वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन केले. ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या विकासकामांसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार भोंडेकर यांचे कौतुक केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमातच भोंडेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.