बीओबी कॅरम स्पर्धेत इंदिरा राणे, विकास महाडिक विजेते

Santosh Sakpal August 21, 2024 11:46 PM

MUMBAI : 

बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये महिला एकेरीत इंदिरा राणेने तर पुरुष एकेरीत विकास महाडिकने विजेतेपद पटकाविले. महिलांच्या अंतिम सामन्यात सुचित्रा कुमारीने ५-० गुणांसह इंदिरा राणेविरुध्द प्रारंभ धडाकेबाज केला. परंतु त्यानंतर आक्रमक व अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवीत इंदिरा राणेने १९-५ अशी बाजी मारली आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, बीओबी कॅरम विभागाचे संयोजक प्रदीप सुरोशे व मनोज नागरे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.

बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने परेल येथील आरएमएमएस सभागृहात झालेल्या चाचणी कॅरम स्पर्धेत एकूण ७६ खेळाडूंनी भाग घेतला होता. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विकास महाडिकने हेमंत शेलारचे आव्हान १२-२ असे सहज संपुष्टात आणतांना सहाव्या फेरीत देखील सहजसुंदर खेळ केला. विकासने बहुतांश प्रतिस्पर्ध्यांना नील गेम देत स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखले. बँक ऑफ बडोदा, मुंबई विभागीय पुरुष संघात विकास महाडिक, हेमंत शेलार, मिरपला राव, अझर अन्सारी तर महिला विभागात इंदिरा राणे, सुचित्रा कुमारी, सिध्दी तोडणकर, ज्योती श्रीमल यांची निवड झाली असून चेन्नई येथे २९ ऑगस्टपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आंतर विभागीय बीओबी कॅरम स्पर्धेमध्ये बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला कॅरम संघाचे ते प्रतिनिधित्व करणार आहेत. पंचाचे कामकाज सचिन शिंदे, अविनाश महाडिक, ओमकार चव्हाण, वेदांत महाडिक, सी. विनय, यश पालकर आदींनी केले.