Shivner News agency /reporter/ Santosh Sakpal
Mumbai -
नाबाद अर्धशतकवीर अभिजित मोरे व अष्टपैलू सुभाष शिवगण यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलचा ६ विकेटने पराभव केला आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे सुरु झालेल्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कप्तान रुपेश कोंडाळकर व विजय नाडकर यांनी दमदार फलंदाजी करूनही लीलावती हॉस्पिटलला पराभव पत्करावा लागला. अष्टपैलू अभिजित मोरेने सामनावीर व रुपेश कोंडाळकरने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सेक्युर वन सेक्युरीटी कंपनीचे सीईओ अरुण माने, क्रिकेटप्रेमी वैभव मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया सहकार्यीत स्पर्धेमध्ये जे.जे. हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून लीलावती हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर वीरेश दांडेकर (३१ चेंडूत २१ धावा) व विजय नाडकर (३२ चेंडूत ३५ धावा) यांची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी आणि रुपेश कोंडाळकरची (२४ चेंडूत ३१ धावा) कप्तानपदास साजेशा फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने मर्यादित २० षटकामध्ये ५ बाद १३८ धावांचा टप्पा गाठला. अभिजित मोरे, प्रकाश सोळंकी, जगदीश वाघेला, राकेश शेलार, रोहित सोळंकी यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर सुभाष शिवगण (३३ चेंडूत ४३ धावा), अभिजित मोरे (३८ चेंडूत नाबाद ५६ धावा) व जगदीश वाघेला (२२ चेंडूत २० धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलने १२ व्या षटकाला १ बाद ९३ धावा झळकावीत विजयाची चाहूल दिली. विशाल शिंदे (२० धावांत १ बळी) व रुपेश कोंडाळकर (१९ धावांत १ बळी) यांनी सामना फिरविण्यासाठी अचूक फिरकी गोलंदाजी करूनही अखेर जे.जे. हॉस्पिटलने १८.४ षटकात १३९ धावा फटकावीत उपांत्यपूर्व फेरी जिंकली.