कल्याण : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पतीने एका पोलिसाच्या हाताला आणि डोक्याला चावा घेतल्याची घटना कल्याणच्या विजयनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती महेश मानेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहे.
कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात महेश माने हा तरुण आपल्या पत्नीसह राहतो. रविवारी रात्रीच्या सुमारास महेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद खूपच विकोपाला गेला. याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नागेशनाथ घुगे आणि हवालदार सांगळे हे दोघे घटनास्थळी दाखल पोहचले. त्यांनी महेश आणि त्याच्या पत्नीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलिसांनाच महेश मानेने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. महेश ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिस कर्मचारी नागेशनाथ घुगे यांच्या हाताला आणि डोक्याला चावा घेतला. त्यानंतर महेशविरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहे.