कमलाबाई कडवे स्मृती मुलींसाठी मोफत कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबरला  

Santosh Sakpal October 04, 2024 05:57 PM

 MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबर रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. शालेय व ज्युनियर कॉलेज सबज्युनियर मुलींच्या सहभागाने ही स्पर्धा चँम्पियन कॅरम सेटवर होईल. स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक-मेडल व 'स्ट्रायकर' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गेल्या महिन्यात शालेय विनाशुल्क तीन कॅरम स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे केवळ शालेय-कॉलेज मुलांसाठी भरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या विविध जिल्ह्यातील शालेय मुलींच्या खास आग्रहास्तव कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व कॅरमप्रेमी सौ. एस.एल. चव्हाण यांनी सदर स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय/कॉलेज मुलींनी मोफत प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे ६ ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा.