मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा.पासून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात रंगणार आहे. ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटामधील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ६४ खेळाडूंमध्ये पहिल्या सत्रात चुरशीच्या साखळी लढती होतील. संघाचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांना अभिवादन करून स्मृती सप्ताहामधील बुध्दिबळ स्पर्धेच्या प्रथम उपक्रमास प्रारंभ होईल.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदाच्या दावेदारीसाठी अधवान ओसवाल, जॉब थॉमस मॅक्सलीन, समीरा थोरात, सक्षम म्हामूण, ध्रुव जैन, मिलन वेद, प्रणव चव्हाण, शान्वी अग्रवाल, सस्मित भूरावणे, अथर्व लखोटिया, स्वरा मोरे, धीर सोनावाला, समर्थ साळगावकर, राज गायकवाड, यश चुरी, सान्वी सिन्हा, गीतेश चव्हाण, थिया वागळे, वारुनिका मेहता, क्षितीज नाईक, सुजय सावंत, स्टीव्हन शिंदे आदी सबज्युनियर बुध्दिबळपटू प्रतिस्पर्ध्यांना शह देणारे विजयी डावपेच रचण्याच्या जय्यत तयारीत आहेत. स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्विस लीग पध्दतीच्या स्पर्धेमधील प्रत्येक साखळी सामने १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटचे होणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, सुनील अहिर, राजन लाड, शिवाजी काळे, मिलिंद तांबे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच गिरणी कामगार महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा दुसरा उपक्रम आंबेकर होमिओपथिक दवाखान्याच्या डॉ. रुपाली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आरएमएमएस प्रांगणामध्ये होणार आहे.
******************************