BY SPORT REPORTER SANTOSH
MUMBAI:-आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रथमेश महाडिक, संकेत किणी, दीपक सिंग, डॉ. हर्शल वाघ यांच्या अप्रतिम खेळामुळे अंधेरीच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलने सोमैया हॉस्पिटल संघावर ८ धावांनी विजय मिळविला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यमगती गोलंदाज दीपक सिंगने सामनावीर व आक्रमक फलंदाज राहुल मोरेने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विराज मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया सहकार्यीत स्पर्धेमध्ये नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर प्रथमेश महाडिक (४० चेंडूत ३७ धावा) व डॉ. हर्शल वाघ ( १६ चेंडूत १६ धावा) यांनी केडीए हॉस्पिटलला १ बाद ६१ धावा अशी दमदार सुरुवात करून दिली. फिरकी गोलंदाज राहुल मोरेने ( २४ धावांत ३ बळी) डावाच्या मध्याला हादरवूनही संकेत किणी (१६ चेंडूत नाबाद ३५ धावा) व अल्केत तांडेल (१५ चेंडूत २० धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून केडीए हॉस्पिटलला मर्यादित २० षटकात ६ बाद १३० अशी आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सोमैया हॉस्पिटलची डॉ. प्रणित बिक्कड व प्रतिक गोरेगावकर ही भरवंशाची सलामी जोडी मध्यमगती गोलंदाज देवेंद्र फणसेने (१८ धावांत ३ बळी) १५ धावसंख्येवर तंबूत पाठविली. त्यानंतर सुशांत गायकवाड (२३ चेंडूत २४ धावा), प्रकाश पुजारी (४१ चेंडूत ३१ धावा), राहुल मोरे (२६ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी करून सोमैया हॉस्पिटलला १६ व्या षटकामध्ये ३ बाद १०६ धावा फटकावून विजया समीप नेले. पण मध्यमगती गोलंदाज दीपक सिंग (११ धावांत ३ बळी) व फिरकी गोलंदाज करण पाटोळे (१६ धावांत २ बळी) यांनी झटपट बळी मिळविल्यामुळे सोमैया हॉस्पिटलचा डाव २० षटकात ९ बाद १२२ धावसंख्येवर गडगडला. परिणामी केडीए हॉस्पिटलने चुरशीचा ८ धावांनी विजय संपादन केला. स्पर्धेनिमित्त टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे माजी कप्तान डॉ. एस.एच. जाफरी यांचा गौरव समारोप दिनी-१९ फेब्रुवारीला होणार आहे.
*********************