माधव आपटे संघाला विजेतेपद; इरा जाधव स्पर्धेत सर्वोत्तम

Santosh Sakpal May 19, 2023 10:51 PM

माधव आपटे चषक १५ वर्षाखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा :


मुंबई,  : क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आयोजित पहिल्या माधव आपटे चषक या १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत आज माधव आपटे संघाने होमी ग्राउंड अकादमी संघावर ८ विकेट्सनी मत करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या होम ग्राउंड अकादमी संघाला त्यांनी ७ बाद ६६ धावांवर रोखले आणि विजयी लक्ष्य १५व्या षटकातच केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

 होम ग्राउंड अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र केवळ १६ धावांतच त्यांनी ४ विकेट्स गमावल्या आणि त्यात तिघी जणी धावचीत झाल्या होत्या. एकूणच या लढतीत त्यांच्या पाच फलंदाज धावचीत झाल्या. अक्षर सिंग (१९) आणि आर्य उमेश (नाबाद १७) या दोघीनी पाचव्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. मात्र अन्य फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत .  विजयासाठी ६७ धावांचे तुटपुंजे आव्हान असतानाही माधव आपटे संघाने १९ धावांत पहिले दोन फलंदाज गमावले त्यावेळी हे लढत चुरशीची होणार असे वाटत होते. मात्र श्रावणी पाटील (३७ चेंडूत नाबाद २७) आणि श्रेणी सोनी (२६ चेंडूत नाबाद २१) या दोघीनी संयमी फलंदाजी करीत ४९ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून श्रावणी पाटील हिची निवड करण्यात आली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघाच्या इरा जाधव (१२३ धावा आणि ५ झेल) हिला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मुग्धा पार्टे (११२ धावा), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मधुरा धडके (५ बळी) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून मिताली गोवेकर यांना गौरविण्यात  आले.  वामन आपटे, नूतन गावस्कर- नातू, सचिन बजाज आणि राजू परुळकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढतीत दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघाने यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी संघाला सहा विकेट्सने नमवून तिसरा क्रमांक  पटकावला.


 


संक्षिप्त धावफलक :होम ग्राउंड अकादमी - २० षटकांत ७ बाद ६६ ( अक्षर सिंग १९, आर्या उमेश नाबाद १७) पराभूत वि. माधव आपटे संघ - १४.५ षटकांत २ बाद ६८ (श्रावणी पाटील नाबाद २७, श्रेणी सोनी नाबाद २१).


 


                                                                  ***


 

 माधव आपटे संघाची कर्णधार वामन आपटे आणि नूतन गावस्कर -नातू (सुनील गावस्कर यांची बहीण) यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्वीकारताना.