माधव आपटे चषक क्रिकेट स्पर्धा : सी.सी.आय., होम ग्राउंड अकादमीची विजयी सलामी
Santosh Sakpal
May 15, 2023 06:26 PM
सी.सी.आय.ची ध्रुवी त्रिवेदी आणि होम ग्राउंड अकादमीची शनाया झवेरी हिला सामनावीर 'किताब प्रदान करताना सी.सी.आय.च्या क्रिकेट विभागाचे प्रमुख राजू परुळकर
मुंबई, : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पहिल्या माधव आपटे चषक या १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी, होम ग्राउंड अकादमी यांनी विजयी सलामी दिली. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळविण्यात आलेल्या सकाळच्या सत्रातील पहिल्या साखळी लढतीत यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी संघाने अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघावर दोन धावांनी निसटता विजय मिळविला तर होम ग्राउंड अकादमी संघाने दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघावर १२ धावांनी मात केली. दुपारच्या सत्रात माधव आपटे संघाने साळगावकर स्पोर्ट्स क्लब वर ८१ धावांनी दणदणीत विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सी.सी. आय. संघाला अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने ९ बाद ७५ धावांवर रोखले . सी.सी.आय. संघाच्या ध्रुवी त्रिवेदी (१४), उन्नती घरात (१८) आणि अनन्या शेट्टी (१३) यांनाच दोन आकडी मजल मारता आली. विदिशा नाईक (७ धावांत २ बळी) आणि प्रियदर्शिनी सिंग (११ धावांत ३ बळी) यांनी ही करामत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गौरी धर्मेतर हिने २६ धावांची झुंजार खेळी करून संघाला विजयाची आस दाखविली होती. मात्र संघाची धावसंख्या ७३ असताना ती धावचीत झाली आणि नंतर त्याच १८व्या षटकात ध्रुवी त्रिवेदीने आणखी दोन बळी मिळवत अचिव्हर्सचा डाव ७३ धावांत संपवला आणि आपल्या संघाला केवळ दोन धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला. ध्रुवी त्रिवेदी हिलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा 'किताब मिळाला. सी.सी.आय.च्या क्रिकेट विभागाचे प्रमुख राजू परुळकर यांच्या हस्ते तिला सामनावीर 'किताब देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या होम ग्राउंड अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ बाद १०१ धावा केल्या. आणि प्रतिस्पर्धी दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघाला ६ बाद ८९ धावांवर रोखून विजयी सलामी दिली. केवळ १० धावांत ३ बळी मिळवणारी शनाया झवेरी ही सामनावीर किताबाची मानकरी ठरली.
दुपारच्या सत्रातील लढतीत माधव आपटे संघाने प्रथांफलंदाजी करताना श्रेणी सोनी (३९) आणि श्रावणी पाटील (नाबाद ४५) यांच्या दमदार फलंदाजी मुळे निर्धारित २० षटकांत ४ बाद १४१ धावा केल्या. या आव्हानासमोर साळगावकर स्पोर्ट्स क्लब संघाला त्यांनी ६० धावांतच गुंडाळले. श्रेणी सोनी हिने केवळ १० धावांतच ४ बळी गुंडाळत सामनावीर 'किताब पटकावला. तिला रितिका यादव हिने १६ धावांत २ बळी मिळवत मोलाची साथ दिली.
संक्षिप्त धावफलक - सी. सी.आय. किड्स अकादमी - २० षटकांत ९ बाद ७५ (ध्रुवी त्रिवेदी १४, उन्नती घरात १८, अनन्य शेट्टी १३; विदिशा नाईक ७ धावांत २ बळी, प्रियदर्शिनी सिंग ११ धावांत ३ बळी) वि.वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी - १८ षटकांत सर्वबाद ७३ ( गौरी धर्मेतर २६; पर्ल कोरिया १८ धावांत २ बळी, ध्रुवी त्रिवेदी ७ धावांत ३ बळी). सामनावीर - ध्रुवी त्रिवेदी
होम ग्राउंड अकादमी - २० षटकांत ९ बाद १०१ (कृतिका यादव १२, मिताली गोवेकर १२, अक्षरा सिंग २४; मधुरा दडके १८ धावांत ३ बळी) वि.वि. दिलीप वेंगसरकर फौंडेशन - २० षटकांत ६ बाद ८९ (मुग्धा पार्टे नाबाद ४८, आशी राणे १७; कृतिका यादव २२ धावांत २ बळी, शनाया झवेरी १० धावांत ३ बळी) सामनावीर - शनाया झवेरी .
माधव आपटे इलेव्हन - २० षटकांत ४ बाद १४१ (आर्या वाजगे १४, श्रेणी सोनी ३९, श्रावणी पाटील नाबाद ४५, भावना सानप नाबाद १६) वि.वि. साळगावकर स्पोर्ट्स क्लब - १८.५ षटकांत सर्वबाद ६० (प्रांजळ सुर्वे १४, अनन्य पाटील ११; श्रेणी सोनी १० धावांत ४ बळी, रितिका यादव १६ धावांत २ बळी ) सामनावीर - श्रेणी सोनी .