मुंबई /शिवनेर/ संतोष सकपाळ
माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय-कॉलेजमधील १८ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी माहीम जुवेनील पव्हेलीयन, शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ वाढदिवस चषक सुपर लीग कॅरम स्पर्धेवेळी ज्युनियर कॅरमपटूनी केलेल्या आग्रहाखातर लागोपाठ तिसऱ्या वर्षी माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लबने स्पर्धा भरविण्याचे ठरविले आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल व स्ट्रायकर पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती क्लबचे खजिनदार महेश शेटे यांनी दिली.
शालेय-महाविद्यालयीन मुख्य कॅरम स्पर्धेअगोदर स्पर्धात्मक सराव मिळण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे,रायगड, पालघर आदी जिल्ह्यातील ज्युनियर खेळाडू उत्सुक आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चँम्पियन कॅरम बोर्डावर दर्जेदार स्पर्धेचे पूर्णपणे मोफत आयोजन होणार असून माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विजय येवलेकर व सेक्रेटरी सुनील पाटील आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते आदींनी पुढाकार घेतला आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधीत खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २२ सप्टेंबरपर्यंत संपर्क साधावा.
******************************