:lमोहालीत इशान-सूर्या शो! पंजाबवर सहा गडी राखून मुंबईचा दणदणीत विजय, पलटणची विजयी घौडदोड सुरूच
Santosh Sakpal
May 04, 2023 06:56 AM
इंडियन प्रीमिअर लीगमधील ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेचा आकडा गाठत शानदार विजय मिळवला.
मुंबई :आयपीएलच्या ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संपन्न झाला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या शतकी भागीदारीने मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेचा आकडा गाठण्यात यश आले. दोघांनी वादळी खेळी करत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईसाठी रोहितचा आयपीएलमधला हा २००वा सामना होता. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २१५ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते ते एमआय पलटणने एक षटक राखून पार केले.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज खेळी केल्यानंतर टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी स्टाईलमध्ये सामना संपवला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ३ बाद २१४ धावा केल्या. मुंबईने १८.५ षटकात ४ गडी गमावत २१६ धावा करत सामना जिंकला.
मुंबईसाठी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. इशानने ४१ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले. या दोघांशिवाय टिळक वर्मानेही झटपट धावा करत सामना संपवला. तिलकने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. टीम डेव्हिडने १० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. टिळकने १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला २१५ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याने २० षटकांत तीन गडी बाद २१४ धावा केल्या. पंजाबकडून स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत नाबाद ८२ आणि जितेशने २७ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी जितेशने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने २० चेंडूत ३० आणि मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूत २७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगला केवळ नऊ धावा करता आल्या. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. अर्शद खानने त्याला एक गडी बाद करत साथ दिली.
२००व्या सामन्यात रोहितची बॅट चालली नाही, झाला शुन्यावर आऊट
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खास होता. मुंबईसाठी रोहितचा हा २०० वा सामना होता, पण तो फलंदाजीने खास बनवू शकला नाही. तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर रोहित ऋषी धवनचा बळी ठरला. मात्र, संघाने सामना जिंकून रोहितला या खास प्रसंगी एक अप्रतिम भेट दिली.