मुंबई, दि. ७ सप्टेंबर : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन देशातील वातावरण गढूळ केले आणि महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. या भिती व दहशतीच्या वातावरणाला छेद देण्याचे महत्वाचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश देत देशाला एकसंध करण्याचे काम केले आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी सांगितले आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नसीम खान आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी संबोधित केले.
नसीम खान पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला फक्त लुटण्याचे काम केले, महागाई प्रचंड वाढवून जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आहे. डॉ. महमोहनसिंह यांचे युपीए सरकार असताना ३५० रुपये असलेला गॅस सिलिंडर ११०० रुपयेपर्यंत वाढवला व आता २०० रुपये कमी करुन माता भगिनींना दिलासा दिल्याचे सांगत आहेत ही जनतेची फसवणूक आहे. पेट्रोल-डिझलेच्या किमतीही भरमसाठ वाढवून मोदी सरकारने नफेखोरी केली आहे. मोदी सत्तेत येण्यापूर्वी २०१४ साली पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४८ रुपये प्रति लिटर होते तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. मोदी सरकारच्या काळात हा कर वाढवून पेट्रोलवर प्रति लिटर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये केले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी यांच्या किमती प्रचंड वाढल्याने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेवर भाजपा बोलत नाही. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. या दुषीत वातावरणातच राहुल गांधी यांनी ‘मोहब्बत की दुकान’ सुरु केली आहे. देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे असे ते म्हणाले.
भाजपा हा फक्त गुजरात व उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित : कुमार केतकर
खासदार कुमार केतकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सर्व निर्णय चुकीचे ठरले आहेत. नोटबंदीचा निर्णय फसला, नोटबंदीने देशातील छोटे, लघु, मध्यम व्यापारी संपले, काळा पैसा आला परत आला नाही, नक्षलवाद, आतंकवाद संपला नाही, त्यामुळे पुलवामा व बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईकच्या नावावर मोदींनी मते मागितली. २०१४ साली लोकसभेला भाजपाला ३१ टक्के मते मिळाली होती तर २०१९ साली ३७ टक्के मते मिळाली होती, याचा अर्थ बहुसंख्य हिंदु समाज भाजपा व मोदी यांच्याविरोधात आहे. दक्षिण भारतात भाजपा कुठेच नाही, पश्चिम बंगाल, बिहारमध्येही नाही. भाजपा हा फक्त गुजरात व उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असेही केतकर म्हणाले.