विजयी नानावटी हॉस्पिटलच्या कुयेस्करचे शतक हुकले

Santosh Sakpal May 25, 2023 12:09 AM


mumbai :  नानावटी हॉस्पिटलने गतविजेत्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा ३८ धावांनी पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची साखळी लढत जिंकली. चौकार व षटकारांची आतषबाजी करणाऱ्या किशोर कुयेस्करचे शतक मात्र अवघ्या ५ धावांनी हुकले. सलामीवीर किशोर कुयेस्कर व अरुण पारचा यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रिकेटप्रेमी मंगेश चिंदरकर, क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, ओमकार चव्हाण व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.


   नानावटी हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुध्द प्रथम फलंदाजी करतांना मर्यादित २० षटकात ३ बाद १८९ धावांची आतषबाजी केली. सलामीवीर किशोर कुयेस्कर (६५ चेंडूत ९५ धावा) व ओंकार जाधव (४१ चेंडूत ६८ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे ७ गोलंदाज हतबल झाले. प्रतिक पाताडे (१६ धावांत ४ बळी) व फरहान काझी (२३ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला विजयी लक्ष्याचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव २० षटकात ९ बाद १५१ धावसंख्येवर संपुष्टात आला. परिणामी नानावटी हॉस्पिटलने ३८ धावांच्या फरकाने ब गटातील साखळी सामना जिंकला. अरुण पारचा (२४ चेंडूत ४८ धावा) व रोहन महाडिक (७ चेंडूत २१ धावा) यांनी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा डाव सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.