MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित संस्थेचे क्रीडा सल्लागार व श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त झालेल्या विनाशुल्क शालेय एकेरी कॅरम स्पर्धेत लव ग्रोव्ह पंपिंग सेकंडरी मुंबई पब्लिक स्कूल-वरळीचा सिध्दांत मोरे विजेता ठरला. अचूक फटक्यांची आतषबाजी करीत सिध्दांत मोरेने चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरचे आव्हान १५-५ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रारंभ छान करूनही सार्थक केरकरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिध्दांत मोरेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या समीर खानचा १०-३ असा तर सार्थक केरकरने डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलच्या ध्रुव भालेरावचा १७-१२ असा पराभव केला. स्पर्धेतील उपांत्यपूर्व उपविजेतेपद सेस मायकल हायस्कूल-चेंबूरचा निखील भोसले, एस.जे. पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे, पार्ले टिळक विद्यालयाचे मंदार पालकर व अमेय जंगम यांनी मिळविले. गौरवमूर्ती क्रीडापटू नरेंद्र राणे, आरएमएमएसचे पदाधिकारी निवृत्ती देसाई व बजरंग चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, पंच चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले. स्पर्धेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहकार्य लाभले होते.