अग्रलेखांच्या बादशहाचे भाकीत आणि आम्ही !

Santosh Gaikwad March 22, 2023 12:00 AM

ज्यांच्या अग्रलेखांवर असंख्य वाचकांच्या उड्या पडायच्या असे दोन संपादक म्हणजे ‘मराठा’कार आचार्य  प्रल्हाद केशव अत्रे आणि ‘नवाकाळ’कार नीळकंठ खाडिलकर. आचार्य अत्रे जेव्हा ‘मराठा’ गाजवीत होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यांचे निधन झाले तेव्हा आम्ही प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे त्या काळात त्यांचे अग्रलेख आम्हाला वाचता आले नाहीत. परंतु पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर मात्र आम्ही त्यांचे अनेक अग्रलेख आवर्जून वाचले. अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना तर आम्ही गुरूच मानले होते. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर अग्रलेख गाजविले ते नीळूभाऊ खाडिलकर यांनी. भाऊंना वाचकांची नाडी चांगली ठाऊक होती. त्यामुळे वाचकांच्या मनातील भावना ओळखून ते दणदणीत अग्रलेख लिहीत. अनेक प्रश्नांवर सरकारला फोडून काढत. वर्तमानपत्रांबद्दल असे म्हटले जाते की, वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहीतील आरसा. त्यात लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब पडायला हवे. भाऊंनी हे तरुण वयात जाणले होते. म्हणूनच एकेकाळी डबघाईला गेलेला ‘नवाकाळ’ त्यांनी नावारुपाला आणला. भांडवलदारी वर्तमानपत्रांच्या राक्षसी स्पर्धेत त्यांनी ‘नवाकाळ’ चालविला, वाढविला आणि गाजविला. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी ‘नवाकाळ’चा खप पाच लाखांच्या वर नेला. केवळ आपल्या धारदार लेखणीच्या बळावर त्यांनी हा पराक्रम केला. आमचे भाग्य असे की, अग्रलेखांच्या या बादशहाने आमच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केले. अग्रलेख कसा लिहावा? हे समोर बसवून शिकविले. आमचा एखादा अग्रलेख बिघडला तर आमची कानउघडणी केली, तसेच एखादा अग्रलेख आवडला तर तो ‘नवाकाळ’च्या पहिल्या पानावर छापला. आमच्या लिखाणाचे कौतुक त्यांनी आपल्या अग्रलेखातून वेळोवेळी केले. दि. २८ जून २०१७ रोजी आमची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाली. त्यावेळी भाऊंनी ‘शाब्बास नरेंद्रा!’ अशा मथळ्याचा अग्रलेख ‘संध्याकाळ’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केला. त्यात आमचे तोंडभरून कौतुक केले. त्यात त्यांनी असेही लिहिले की, ‘आमच्या अग्रलेखांची आठवण जर संधी मिळाली तर नरेंद्र करून देईल!’ आमच्या गुरूने आम्हाला दिलेले हे सर्वात मोठे बक्षीस होय. 


त्याआधी  देखील नीळूभाऊंनी असाच दृष्ट लागावा असा आशीर्वाद आम्हाला दिला होता. तो दिवस होता गुढीपाडव्याचा! तारीख होती ६ एप्रिल २००८. त्यादिवशी नीळूभाऊंचा वाढदिवस होता. आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘नवाकाळ’ ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यावेळी भाऊंनी त्यांचा एक नवा कोरा ग्रंथ आम्हाला भेट दिला. त्यावर त्यांनी लिहिले होते ते असे : ‘प्रिय श्री. नरेंद्र वाबळे अग्रलेख गाजविणार हे माझे भाकीत - नीलकंठ खाडिलकर, अग्रलेखांचा बादशहा, नवाकाळ. गुढीपाडवा, ६ एप्रिल २००८.’ भाऊंनी हा आशीर्वाद दिला तेव्हा पत्रकारिता डिजिटल युगात पोहोचली नव्हती. प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया ही दोनच माध्यमे तेव्हा अस्तित्वात होती. त्यापैकी प्रिंट मिडीया चालविणे हे दिवसेंदिवस जिकीरीचे होत चालले होते. वृत्तपत्रांच्या कागदाचे भाव गगनाला भिडले होते. या पार्श्वभूमीवर लाखो प्रती प्रसिद्ध करून त्या खपविणे हे महाकठीण होते. पण तरीही नीळूभाऊंनी आमच्यावरील प्रेमाखातर आम्ही अग्रलेख गाजविणार, असे भाकीत केले होते. आज प्रिंट मिडीयाला मर्यादा आहेत. वृत्तपत्रांचा खप कमी झाला आहे. पण डिजिटल मिडीया मात्र झपाट्याने वाढतो आहे. नव्या युगात स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे असते. तुम्ही टिकलात तरच पुढे जाता. थांबलात की संपता. हे सारे ध्यानात घेऊनच आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही 'shivner.com' या ‘शिवनेर’च्या ऑनलाइन आवृत्तीचा शुभारंभ करीत आहोत. तशी ‘शिवनेर’ची वेबसाईट ही गेली १४ वर्षे कार्यरत आहे. या वेबसाईटला जगभरातील वाचक भेट देत असतात. अगदी अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, नॉर्वे, आफ्रिकन  देश इत्यादी भागातून वाचकांनी या वेबसाईला भेट दिल्याचे रोज दिसून येते. आतापर्यंत या वेबसाईटवर केवळ ‘शिवनेर’च्या चार पानांची PDF  आवृत्ती दिसत होती. येथून पुढेही ही आवृत्ती दिसत राहील. पण त्याचबरोबर राजकारण, क्रीडा, मनोरंजन, गुन्हेगारी आदी विविध क्षेत्रातील बातम्या २४ तास दिसत राहतील. नव्या ब्रेकिंग न्यूज वाचकांच्या भेटीला येत राहतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध विषयांचा मागोवा घेणारे आमचे संपादकीय जवळजवळ रोजच वाचकांना वाचावयास मिळेल. ते चांगले असले तर त्यावर वाचकांच्या उड्या पडतील. आम्हाला वाचकांचे प्रेम मिळेल. प्रत्येक संपादकाला आणि लेखकाला हेच हवे असते. आम्ही संपादकाच्या खुर्चीवर बसल्यानंतर एक नियम कटाक्षाने पाळत असतो. निष्पक्षपणे लिखाण करणे हा तो नियम होय. आमचे वडील शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे आणि गुरुवर्य नीळूभाऊ खाडिलकर यांच्याकडून आम्ही हा निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा वारसा उचलला आहे, हे सांगण्यास आम्हाला अभिमान वाटतो.

आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही ऑनलाइन शिवनेरची गुढी उभारत आहोत. भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते  ऑनलाईन शिवनेरचा शुभारंभ करणार आहोत. ऑनलाइन आवृत्तीमुळे ‘शिवनेर’च्या बातम्या, अग्रलेख, लेख व व्हिडीओ आता भारताच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचणार आहेत. अग्रलेखांच्या बादशहाने केलेले भाकीत नक्कीच खरे होणार आहे. अग्रलेख गाजविण्याची संधी आता आम्हाला मिळाली आहे. ‘शिवनेर’च्या या यशामध्ये आमच्या आई-वडिलांचा आणि नीळूभाऊंचा आशीर्वाद यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर वाचकांचा देखील मोठा वाटा आहे. १४ वर्षांपूर्वी ‘शिवनेर’ची वेबसाईट आमचे मित्र अनुपम वाडेकर यांनी बनविली. गेली १४ वर्षे त्यांनीच ती हाताळली. आता नवीन अत्याधुनिक वेबसाईट देखील त्यांनीच तयार केली आहे. या अनुपम वाडेकरांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. आमच्या असंख्य वाचकांना, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

- नरेंद्र वि. वाबळे