दर्शनाचे लग्न दुस-या मुलाशी ठरल्याने केली हत्या, राहुल हंडोरेची कबुली !
Santosh Gaikwad
June 22, 2023 09:45 PM
पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री अटक केली. दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिची तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दिली.
दर्शना पवार हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता. दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुणे ग्रामीणच्या वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवाशी असून, राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र असून, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. परंतु दर्शनाचा फोन लागत नसल्यामुळे दर्शनाचे वडील आणि नातेवाइकांनी किल्ले राजगडच्या परिसरात शोध घेतला. परंतु तिचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वडिलांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दर्शना आणि राहुल दोघे सकाळी सव्वासहा वाजता किल्ले राजगडावर जाताना एकत्रित दिसत होते. परंतु परत येताना पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तो एकटाच दिसून आला होता. त्यामुळे राहुल याच्यावर संशय बळावला होता. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे अद्याप जप्त केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.