मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धेत इंदू मिलचा राकेश कोचरेकर, एनटीसीचा विलास काळे, टाटा मिलचा अभिषेक कदम, पोद्दार मिलचा विशाल सागवेकर, आरएमएमएसचे हरीश देठे व ओमकार हडशी आदींनी विजयीदौड केली. प्रारंभापासून आघाडी घेत अचूक सोंगट्या टिपणाऱ्या राकेश कोचरेकरने इंदू मिलच्या तयलू जांबीचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणले आणि उद्घाटनीय लढत जिंकली. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
परेल येथील आरएमएमएस सभागृहात अप्रतिम फटक्यांची आतषबाजी करीत एनटीसीच्या विलास काळेने टाटा मिलच्या हरिहर यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. परिणामी विलास काळेने २५-४ असा विजय मिळवीत जोरदार आगेकूच केली. अन्य सामन्यात टाटा मिलच्या अभिषेक कदमने विनायक शिंदेचा १३-० असा, पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरने किशोर पांचाळचा १३-४ असा, आरएमएमएसच्या हरीश देठेने इंदू मिलच्या गंगाराम गावडेचा २५-० असा तर आरएमएमएसच्या ओमकार हडशीने पोद्दार मिलच्या सुभाष घाडगेचा ११-४ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, माजी प्रादेशिक संचालक प्रदिप मून, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
******************************