MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेस २३ मे पासून प्रारंभ होत आहे. उद्घाटनीय साखळी अ गट लढत जे.जे. हॉस्पिटल विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये मंगळवारी सकाळी ९.०० वा. शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनैल खेळपट्टीवर होईल. क्रिकेटप्रेमी व श्री सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर, अविनाश दुधाणे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल.
विजेतेपदाचा अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक पटकाविण्यासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आदी संघ पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे प्रथम साखळी व त्यानंतर बाद फेरीचे सामने ३१ मेपर्यंत रंगतदार होतील. विजेत्या व उपविजेत्यांना तसेच सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज, पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडू, सामनावीर आदी आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ. हर्षद जाधव, केडीए हॉस्पिटलचे संदीप देशमुख व कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. परमेश्वर मुंडे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.