मुंबई महापालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला आग लागल्यामुळे मुंबई महानगरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आलं होतं. हे दुरुस्तीचं काम टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारीत पंप सुरू करण्यात आलं. दुरुस्तीसाठी परिक्षणाअंतर्गत तिसरा ट्रान्सफॉर्मरदेखील नुकताच सुरू झाला होता. त्यावर आधारित पाच पंप चालू झाले आहेत. तर आता पिसे केंद्रातील सर्व म्हणजे २० पैकी २० पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र देखील पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलं आहे.
सद्यस्थितीत तीन ट्रान्सफार्मर सुरु झाले आहेत. यामुळे आता २० पंप सुरू करण्यात आले आहेत. तसेच या ट्रान्सफार्मर आधारीत पंपदेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी आदी भागात जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात बुधवारपासून मागे घेण्यात येत आहे.