रोझरी कॅरम: ईशान, प्रथमेश, रीदा, अंजेल उपांत्य फेरीत
Santosh Sakpal
July 19, 2023 07:40 PM
mumbai : रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड रोड कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात ईशान शिंदे, प्रथमेश बोरीचा, नैतिक राठोड तर मुलींच्या गटात रीदा खान, अंजेल प्रजापती, झीक्रा मुकादम आदींनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने सुरु झालेल्या कॅरम स्पर्धेत ईशान शिंदेने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत श्लोक मोरेचे आव्हान १५-० असे सहज संपुष्टात आणले. रीतीश हरिजनने उत्तम प्रारंभ करूनही प्रथमेश बोरीचाने ८-४ अशी बाजी मारली. स्पर्धेचे उद्घाटन प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील, श्रीमती तनवीर दास, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आले.
मुलींच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात राणीने हुलकावणी देऊनही रीदा खानने तनिष्का चिकलेला १२-० असे सहज पराभूत केले. अंजेल प्रजापतीने मेहेर कुरेशीवर १०-० असा विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. झीक्रा मुकादमला ८-४ असा विजय मिळविण्यासाठी मुनैझा साबुवालाने शेवटपर्यंत झुंजविले. नैतिक राठोडने श्रीतेज महाडिकला १२-६ असे नमविताना राणीवर वर्चस्व राखले. बोर्ड रेफरीचे कामकाज क्रीडा शिक्षक मोजेस लोपीस व राम गुडमे यांनी पाहिले. डीएसओ कॅरम स्पर्धेपूर्वी रोझरी हायस्कूलच्या खेळाडूंना सराव मार्गदर्शन शिबीर आयोजित करून देण्यासाठी सिस्टर विजया चलील विशेष प्रयत्नशील आहेत. आंतर शालेय कॅरम स्पर्धेतील पुरस्काराने सिस्टरना वाढदिवसाची भेट देण्यासाठी रोझरी हायस्कूलच्या कॅरम खेळाडूंनी चंग बांधला आहे.