मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून देशात राजकारण पेटलं आहे. आम आदमी पक्षाने मोदी यांच्या डिग्रीवरून आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री नव्या संसदेसमोर लावायला हवी, अशा शब्दात संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी चहा विकून स्वतचं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी घेतलेली डिग्री लपवण्याचं काय कारण, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत मोदींवर त्यांच्या डिग्रीवरून निशाणा साधला. तर आज संजय राऊत यांनीदेखील हाच मुद्दा लावून धरला आहे. राऊत सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅटफॉर्मवर चहा विकला. बीए एम ए विथ इंटायर पॉलिटिकल सायन्स.. ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विषयात पदवी घेतली आहे. ही त्यांची डिग्री संसदेला समजली पाहिजे. मोदींनी नवी संसद बनवली, तिथं लावावी. त्यात लपवण्यासारखं काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधानांची डिग्री मागणाऱ्या अरविंद केजरीवालांवर २५ हजार रुपयांचा दंड लावतात, हा कुठला न्याय आहे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे .
------------------