मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हक्कभंग समितीने आपला अहवाल परिषदेला सादर केला. संजय राऊत यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत पुढील कारवाईसाठी तो राज्यसभेकडे पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परिषदेत दिली. राऊत यांच्या अडचणी यामुळे वाढणार आहेत.
कोल्हापूर येथील दौऱ्या त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असा उल्लेख केला होता. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राऊत यांच्या विरोधात हक्कभंग ठराव विधान परिषदेत मांडला होता. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, राऊत यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले होते. संजय राऊत यांनी माझे विधान संपूर्ण विधिमंडळाला नसून केवळ शिंदे गटाच्या आमदाराना होते, असा खुलासा केला होता. संजय राऊत त्यांनी केलेला खुलासा हक्कभंग समितीकडे पाठवला होता. हक्क भंग समितीने यावर आक्षेप घेत, उत्तर समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. आज विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हक्कभंग समितीचा अहवाल वाचून दाखवला. तसेच समितीने नोंदवलेल्या हरकती राज्यसभेकडे पाठवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीने 23 ऑगस्ट 1954 रोजी केलेल्या अहवालात नमूद केलेले केल्याप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य केलेल्या कार्यपद्धती सर्व राज्यांच्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या अनुषंगाने असे प्रकार रूढ झाले की राज्य विधिमंडळाच्या एका सदस्याने दुसऱ्या सदस्याच्या विरोधात, संसद व अन्य राज्य विधिमंडळाच्या विरोधात अधिकार भंग व अवमान केल्याची बाब प्रथमदर्शनी समोर आल्यास, ज्या सदस्यविरोधात हक्कभंग समितीने दाखल केले हक्कभंग सभागृहाच्या सदस्याकडे पाठवले जाते.
संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सभागृहांनी नेमण्यात विशेष अधिकार समित्यांवर, समित्यांच्या नि:पक्षपातीपणावर, एकूणच समितीच्या कार्यवाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेच्या सदस्य असूनही विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीच्या कारवाईबाबत संशय निर्माण करणे, अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्य विधान परिषदेच्या अधिकार संदर्भात केलेल्या खुलासाबाबत मताशी सहमत होऊ शकत नाही. त्यांचा खुलासा मला उचित व समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे प्रथा आणि परंपरेनुसार भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात संसदीय समन्वय राखण्यासाठी आणि माझे उत्तरदायित्व याचा विचार करून संजय राऊत यांचा खुलासा विशेष अधिकारी म्हणजेच राज्यसभेकडे पाठवत असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.