ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुमती सेवा मंडळ-दहिसर सहकार्याने राष्ट्रीय क्रीडा दिन-२९ ऑगस्ट निमित्त होणाऱ्या संत ज्ञानेश्वर चषक शालेय मोफत कॅरम स्पर्धेत ६४ खेळाडूमध्ये चुरस असेल. १६ वर्षाखालील व इयत्ता १० वीपर्यंतच्या शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शालेय कॅरमपटू सहभागी होणार आहेत.
सार्थक केरकर, निधी सावंत, स्वरा मोहिरे, श्रीशान पालवणकर, प्रसन्ना गोळे, साहिल वाघेला, सुशांत कदम, गौरांग मांजरेकर, हर्षद चव्हाण, अथर्व आरकर, तन्वी कांबळे, वेदांत पाटणकर, देविका जोशी, उमर पठाण, अर्णव गावडे, याद्नेश देवरा आदी खेळाडू स्पर्धा गाजविण्यासाठी उत्सुक आहेत. शालेय खेळाडूंना डीएसओ व इतर शालेय कॅरम स्पर्धेअगोदर सामन्यांचा सराव मिळावा, म्हणून चँम्पियन कॅरम सेटवर वडाळा-पश्चिम येथील ज्ञानेश्वर विद्यालयात विनाशुल्क स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांना नामवंतांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी भास्कर सावंत व प्रमोद पार्टे यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव सुर्यकांत कोरे व मुख्याध्यापक महेंद्र पाटील, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ******************************