सत्यशोधक शिवनेरकार

Santosh Gaikwad March 20, 2023 12:00 AM

शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांची आज १०६ वी जयंती. शिवनेरकारांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. काही दिवस भूमिगत झाले.  स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते लढत राहिले. पुढे बाबासाहेब गावडे यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांनी मराठा मंदिर या संस्थेची स्थापना केली. पुढे काही काळ मराठा मंदिर मध्ये त्यांनी सुपरिंटेंडेंट म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांच्या अखत्यारीत ४२ शाळा व २ ट्रेनिंग कॉलेज होते. पण त्यांचे मन नोकरीत काही रमले नाही. १९५२ साली त्यांनी राजकारणात उडी घेतली. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर जुन्नर तालुक्यातून विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हा त्यांनी फ्री लांस पत्रकारिता सुरु केली. पण पत्रकारितेतील एक कटू अनूभव त्यांना लौकरच आला. जातीवाचक म्हणी जातीयवाद पसरवितात. तेव्हा भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी किंवा मांडीखाली आरी अन् चांभार पोरे मारी यासारख्या म्हणींवर बंदी घालावी अशी मागणी करणारा लेख त्यांनी लिहिला. तो एका दैनिकाकडे प्रसिद्धीसाठी पाठविला. पण दैनिकाच्या संपादकाने तो साभार परत पाठविला. त्यावेळी आपल्याला जर समाजाला काही सांगायचे असेल तर आपले स्वतःचे वर्तमानपत्र असले पाहिजे हे या तरुण ध्येयवादी पत्रकाराने ओळखले. अशाप्रकारे दि.८ मे १९५४ रोजी शिवजयंतीच्या शूभमुहूर्तावर साप्ताहिक शिवनेरची स्थापना झाली. त्यानंतर पुढील तब्बल पन्नास वर्षे शिवनेरकारांनी रक्ताचे पाणी आणि हाडाची काडे करुन परिश्रमपूर्वक ‘शिवनेर’ चालविला. आधी साप्ताहिक, नंतर सांज दैनिक व १९८४ पासून सकाळचे दैनिक म्हणून त्यांनी ‘शिवनेर’च्या रुपात ध्येयवादी पत्रकारितेची सुवर्ण परंपरा पुढे नेली.


फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर शिवनेरकारांची अढळ श्रद्धा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे श्रद्धास्थान होते. याच श्रद्धेतून त्यांनी ‘शिवनेर’चा पहिला खास अंक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर काढला. तो दादर येथील बाबासाहेबांच्या निवास्थानी जाऊन त्यांना अर्पण केला. त्यावेळी बाबासाहेबांनी ‘शिवनेर’च्या पुढील वाटचालीस मुक्त कंठाने शुभेच्छा दिल्या. आज सात दशकांच्या खडतर वाटचालीनंतर देखील ‘शिवनेर’ खंबीरपणे उभा आहे. दि.२२ मार्च २०२३ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाइन शिवनेरचा शुभारंभ होत आहे. भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते डिजीटल शिवनेरचा शुभारंभ होत आहे. हे सारे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याच आशिर्वादाचे फलित आहे असे आम्ही मानतो. शिवनेरकारांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. सत्यशोधक समाजाच्या विचारांची कास कधीच सोडली नाही. पित पत्रकारिता कधी केली नाही. समोर आलेले मोहाचे क्षण त्यांनी पायदळी तुडविले. जातीयवादी शक्तींना त्यांनी सदैव फोडून काढले. त्यांच्या त्या सत्यशोधकी पत्रकारितेचा वारसा आम्ही अभिमानाने पुढे चालवित आहोत. सत्यशोधक शिवनेरकारांच्या पवित्र स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम.

 -नरेंद्र वि.वाबळे