श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत पौरस करगुटकर विजेता

Santosh Sakpal April 30, 2024 02:33 PM


मुंबई: शिवनेर 

     खालसा कॉलेजच्या पौरस करगुटकरने श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर कॉलेज एकेरी कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूनी निर्णायक फेऱ्यांमध्ये चुरशीचा खेळ केल्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. अंतिम फेरीत पौरस करगुटकरने मॉडेल कॉलेज-डोंबिवलीच्या समृध्दी घाडीगावकरचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री नारायण गुरु कॉलेज समितीचे अध्यक्ष एम.आय.दामोदरन व जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, उपप्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटअचलम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर, स्पोर्ट्स प्रोफेसर रेश्मा खुदाबक्ष, प्रोफेसर नाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


    निर्णायक फेरीतील पहिल्या सेटमधील पहिलाच बोर्ड ५-० असा घेत समृध्दी घाडीगावकरने पौरसविरुध्द दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सावध व अचूक खेळ करून प्रत्येक बोर्ड घेत पौरस करगुटकरने पहिला सेट ८-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राणीवर सतत कब्जा मिळवीत पौरसने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि १५-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी जिंकली. राष्ट्रीय ख्यातीचे उदयोन्मुख कॅरमपटू अंकित मोहिते व निलांश चिपळूणकर यांना हरवून समृध्दी घाडीगावकरने निर्माण केलेली विजेतेपदाची दावेदारी अखेर फोल ठरली आणि तिला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पौरस करगुटकरने पोद्दार कॉलेजच्या रुची माचीवलेचा ७-१०, १३-०, १३-७ असा तर समृध्दी घाडीगावकरने हिंदुजा कॉलेजच्या निलांश चिपळूणकरचा ८-६, ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. विविध जिल्ह्यातील कॉलेज कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ जूनला आयडियलतर्फे होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.


******************************