मुंबई शिवनेर
श्री शिवाजी मंदिर ७ व ८ वर्षाखालील जलद बुध्दिबळ स्पर्धेमधील दोन्ही गटाचे विजेतेपद अपराजित राहून पटकाविणारा ७ वर्षीय सबज्युनियर बुध्दिबळपटू देटीन लोबोला सर्वोत्तम खेळाडूचा विशेष रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन व शिवजयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे ७ ते १४ वर्षाखालील एकंदर ८ वयोगटामध्ये ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण ११० खेळाडूंच्या सहभागाने दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात रंगतदार झाली.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने झालेल्या स्पर्धेमधील ८ वर्षाखालील गटात देटीन लोबोने ६४ घरांमध्ये आपल्या सैन्याचे अचूक डावपेच रचून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण केले. लोबोने उपविजेता ओम गणू, मुलींमधील विजेती अनिष्का बियाणी व उपविजेती ओमिशा अरोरा यांच्या राजावर केलेले हल्ले शरणागती पत्करण्यास भाग पडणारे ठरले. ७ वर्षाखालील गटात द्वितीय विजेता आर्शिव गोयल, तृतीय विजेता कबीर पिंगे व चतुर्थ विजेता वेदांत चिदंबरम आदी प्रमुख खेळाडूंना लोबोने लीलया नमवून साखळी सर्व ५ गुणांसह गटविजेतेपद हासील केले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी लोबोच्या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक होण्यासाठी संयोजक लीलाधर चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यास प्रतिसाद देत श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत, सेक्रेटरी संतोष शिंदे, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, विश्वस्त ज्ञानेश महाराव आदी मान्यवरांनी लोबोचे विशेष रोख रुपये दोन हजार पुरस्कारासह अभिनंदन केले.
***********************