मुंबई _:श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाने आणि मुलींमध्ये एसआयईएस हायस्कूलने अजिंक्यपद पटकाविले. मध्यंतरापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या अंतिम सामन्यात श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाने सुंदरम गुप्ता व रणवीर सिंगच्या अष्टपैलू खेळामुळे आंध्रा एज्युकेशनचा ४१-२५ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कमोर्तब केला. कप्तान राज गुप्ताने चौफेर चढाया करूनही आंध्रा एज्युकेशनला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्नेहा पिसाळच्या चौफेर चढायांमुळे एसआयईएस हायस्कूलने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय विरुध्द मध्यंतरालाच ३० गुणांची मोठी आघाडी घेत निर्णायक सामना ४६-२२ असा जिंकला आणि विजेतेपद हासील केले. उपविजेत्या संघाची ईशा डिगे चढाईत चमकली.
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या मुलांच्या सामन्यात चिकित्सक समूह शाळेने सांघिक खेळाच्या बळावर मराठा हायस्कूलचे आव्हान ४८-३१ असे तर मुलींमध्ये चुनाभट्टी मनपा शाळेने कप्तान आयुषी यादव व ख़ुशी प्रजापती यांच्या अष्टपैलू खेळामुळे आंध्रा एज्युकेशनचे आव्हान ३७-७ असे संपुष्टात आणले. दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ४८ शालेय संघांनी दोन दिवस प्रेक्षकांना कबड्डीचा थरार दर्शविला. मुलींमध्ये सर्वोत्तम कबड्डीपटू स्नेहा पिसाळ, उत्कृष्ट चढाई आर्या देवरकर, उत्कृष्ट पकड श्रावणी पवार तर मुलांमध्ये सर्वोत्तम कबड्डीपटू सुंदरम गुप्ता, उत्कृष्ट चढाई राज गुप्ता, उत्कृष्ट पकड रणवीर सिंग यांनी पुरस्कार यांनी पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ समितीचे अध्यक्ष प्रकाश परब, अविनाश नाईक, मधुकर प्रभू, गुरुनाथ पांगम, किरण पाटकर, मयुरेश मोंडकर, डॉ. यशस भुरे, संजय आईर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
******************************