सिमरन शिंदेने प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा जिंकली
Santosh Sakpal
January 01, 2024 09:58 AM
मुंबई शिवनेर:
कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा मराठा हायस्कूल-वरळीच्या सिमरन शिंदेने जिंकली. अंतिम सामन्यात सिमरन शिंदेने श्रीशान पालवणकरचा १९-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. परिणामी ईझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईच्या श्रीशान पालवणकरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चेंबूर-पश्चिम येथील श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-स्पोर्ट्स जिमखान्यामध्ये झालेल्या शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यातील ६४ शालेय खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेतील उपांत्य उपविजेतेपद ध्रुव भालेराव-अॅन्टोनियो डासिल्व्हा हायस्कूल व वेदांत राणे-युनिव्हर्सल हायस्कूल; उपांत्यपूर्व उपविजेतेपद पुष्कर गोळे-पोदार अकॅडमी, नैतिक लाडे-जीएमपीएस, नेहाल उस्मानी-पोदार अकॅडमी, आयुष गरुड-आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे तर उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद ध्रुव शाह-पोदार अकॅडमी, निखील भोसले-मायकल हायस्कूल, समीर खान-बीए विद्यालय, सार्थक केरकर-पार्ले टिळक विद्यालय, प्रसन्ना गोळे-पोदार अकॅडमी, कृष्णा खेमकर-एनइएस हायस्कूल, गौरांग मांजरेकर-पाटकर विद्यालय, प्रसाद माने-पाटकर विद्यालय यांनी मिळविले. विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन श्री नारायण गुरु कॉलेजचे जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, स्पोर्ट्स डायरेक्टर पूनम मुजावर, अविनाश स्पोर्ट्सचे प्रमुख अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळीनी गौरविले. प्रमुख पंचाचे कामकाज कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर व क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी पाहिले. सहभागी खेळाडूंच्या पालकवर्गाने मोफत संयोजनाचे विशेष कौतुक केले.
******************************