मुंबई : एमसीए कार्पोरेट बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद स्पेस स्पोर्ट्स क्लबने पटकाविले. पोलीस जिमखान्यावर झालेल्या अंतिम सामन्यात स्पेस स्पोर्ट्स क्लबने डीटीडीसी एक्सप्रेस क्रिकेट संघाचा ७ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. सिध्दार्थ आक्रेच्या ५ षटकारांसह धडाकेबाज नाबाद ४९ धावा आणि मध्यमगती गोलंदाज गोपेंद्र बोहराने घेतलेले पहिले तिन्ही बळी, यामुळे स्पेस क्लबचा विजय सुकर झाला.
स्पेस स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून डीटीडीसी संघाला प्रथम फलंदाजी दिली. मध्यमगती गोलंदाज गोपेंद्र बोहरा (११ धावांत ३ बळी) व डावखुरा फिरकी गोलंदाज साईद खोत (६ धावांत २ बळी) यांच्या प्रमुख गोलंदाजीमुळे डीटीडीसीचा संघ १९.५ षटकात १०५ धावसंख्येवर गारद झाला. सलामीवीर जपजीत रंधवा (३० चेंडूत २८ धावा) व डावखुरा भूषण तळवडेकर (१८ चेंडूत २३ धावा) यांनी डाव सावरण्याचा छान प्रयत्न केला. प्रत्युत्तर देतांना स्पेस स्पोर्ट्स क्लबचे दोन्ही सलामी फलंदाज पव्हेलीयनमध्ये लवकर परतले. तरीही सिध्दार्थ आक्रे (३३ चेंडूत नाबाद ४९ धावा), डावखुरा सिध्दार्थ म्हात्रे (२१ चेंडूत नाबाद २४ धावा) व ऋग्वेद मोरे (१८ चेंडूत २४ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे स्पेस स्पोर्ट्स क्लबने १४.२ षटकात विजयी लक्ष्य ३ बाद १११ धावांनी साकारले.
******************************