श्री उद्यानगणेश मंदिर कबड्डी: आंध्रा एज्युकेशन, सनराईज स्कूलची विजयी सलामी

Santosh Sakpal January 08, 2024 10:44 PM

    MUMBAI-SHIVNER

श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुलींच्या गटात आंध्रा एज्युकेशन सोसायटी-वडाळा, एसआयईएस हायस्कूल-माटुंगा, प्रभादेवी म्युनिसिपल माध्यमिक शाळा तर मुलांच्या गटात सनराईज हायस्कूल-वरळी, कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल-लोअर परेल आदी संघांनी सलामीचे सामने जिंकले. शालेय कबड्डीच्या एकूण ४६ संघांमध्ये चुरशीचे सामने होत असून अंतिम फेरीच्या लढती ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये रंगतील. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पांगम, कार्यवाह मधुकर प्रभू, समर्थ व्यायाम मंदिरचे अध्यक्ष उदय देशपांडे, समितीचे विश्वस्त डॉ. अरुण भुरे, अविनाश नाईक, विजय साखरकर, अजित पिंपुटकर, डॉ. यशस भुरे, नीरज पांगम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.


     श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती-मुंबई आयोजित मुलींच्या शालेय कबड्डी सामन्यात आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल विरुद्ध मराठा हायस्कूल-वरळी यामधील उद्घाटनीय लढत शेवटपर्यंत  अटीतटीची झाली. त्रिशा सिंगच्या दमदार चढाया व गायत्री गुप्ताचे उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे आंध्रा हायस्कूलने मध्यंतराला २३-१९ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात श्रावणी शिरसाट व वैष्णवी कोळी यांनी आक्रमक खेळ करून मराठा हायस्कूलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर पहिल्या डावातील वर्चस्वाच्या जोरावर आंध्रा हायस्कूलने ३४-३० अशी बाजी मारली. तनुश्री शिंदे व स्नेहा पिसाळ यांच्या सुंदर खेळामुळे एसआयईएस हायस्कूलने शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश स्कूलवर  ३७-१६ असा तर श्रुतिका शिंदे व सानिका शिगवण यांच्या चतुरस्त्र खेळामुळे प्रभादेवी म्युनिसिपल माध्यमिक शाळेने बालमोहन विद्यामंदिरवर ४७-४० असा विजय मिळविला. मुलांच्या गटात सनराईज हायस्कूलने विनोबा भावे नगर म्युनिसिपल हिंदी शाळेचा ४७-४५ असा आणि महाराष्ट्र हायस्कूलने श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलचा ३७-३४ असा चुरशीचा पराभव केला. कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने डॉ. डी.बी. कुळकर्णी विद्यालयाला ५६-२६ असे सहज हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.