राज्य सरकारचा दिलासा : रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही

Santosh Gaikwad March 31, 2023 04:53 PM

मुंबई :  राज्यातील रेडीरेकनरच्या दरात यंदाच्या वर्षी राज्य सरकारकडून  कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार नाहीत.  मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच सन 2022-23 मधील रेडीरेकनर दर 2023-24 च्या आर्थिक वर्षात कायम राहणार आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याचे उप-सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रकांना पाठवलं आहे.  त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारकडून नवीन घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. . 

 

राज्यात गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली होती. पालिका क्षेत्रात ८.८० टक्के, ग्रामीण भागात ६.९६ टक्के तर नगरपालिका क्षेत्रात ३. ६२ टक्के वाढ करण्यात आली होती.  कोरोनाच्या संकटामुळे त्या आधी दोन वर्षे रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झाली. राज्यात सर्वाधिक १३. १२ टक्के वाढ मालेगाव पालिका क्षेत्रात झालीय तर सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्ह्यात झालीय. गेल्या वर्षी मुंबई महापालिका क्षेत्रात रेडीरेकनरच्या २.३४ टक्के एवढी वाढ झाली होती. 


मुंबई शहरात मार्च २०२३ मध्ये १२,४२१ युनिट्सची मालमत्ता विक्री नोंदणी झाली. ही वाढ २८ टक्के इतकी असून, या आर्थिक वर्षातील सर्वोत्तम आहे.  त्यामुळे राज्याच्या महसुलात १,१४३ कोटी  पेक्षा जास्त भर पडली. एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी ८४ टक्के निवासी तर १६ टक्के अनिवासी मालमत्ता होत्या.  रेडीरेकनर स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. रेडीरेकनरमध्ये जिल्हा, तालुका आणि गाव यांनुसार स्वतंत्र दर निश्चित करण्यात येतात. रेडीरेकनरनुसार मालमत्तेचा बाजारभाव निश्चित होतो. नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर रेडीरेकनर दरवर्षी निश्चित केलं जातं. रेडी रेकनरचा उपयोग सर्वसामान्य माणसांपासून बांधकाम व्यावसायिक, कर्ज देणाऱ्या बँका, वकील, एजंट इत्यादींना होतो.

 

 घरांच्या किंमती दिवसोंदिवस वाढत असल्याने दुसरीकडे तयार घरांना अधिक दर असल्याने ग्राहकच मिळत नाहीत. ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये ३ लाखांहून अधिक घरं पडून आहेत. तसेच सिडको आणि म्हाडामार्फत घेतल्या जाणाऱ्या घरांच्या लॉटरीला काही ठिकांणी अल्प प्रतिसाद मिळत आहे. या लॉटरीमधील घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अनेकांना या लॉटरीमध्ये घरं लागूनही घरांचे पैसे न भरल्याने घरं विक्रीशिवाय पडून असल्याची माहिती समोर आली आहे.