मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लाॅक !

Santosh Gaikwad April 05, 2024 08:42 PM


मुंबई :  मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी  दि ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल. तसेच, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.  

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान रविवार, ७ एप्रिल रोजी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

 या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. त्यानंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

याशिवाय, ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येती. परिणामी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

 या ब्लॉकच्या कालात सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

दरम्यान, ब्लॉकपूर्वी डाऊन धीम्या मार्गावरील शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५३ वाजता सुटेल. तसेच, ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३३ वाजता सुटेल. तसेच, ब्लॉकपूर्वी अप धीम्या मार्गावरील शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटणार आहे. तर, ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असून ठाणे येथून दुपारी ०४.०३ वाजता सुटणार आहे.

 
ट्रान्स हार्बर
ट्रान्स हार्बर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

या ब्लॉकच्या कालावधीत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर शेवटची लोकल ही पनवेल लोकल आहे. ही लोकल ठाणे येथून सकाळी १०.३५ वाजता सुटणार आहे. तसेच, ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी लोकल ठाणे येथून दुपारी ४.१९ वाजता सुटणार आहे. शिवाय, अप ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वाशी येथून सकाळी १०.१५ वाजता सुटणार आहे. तसेच, ठाण्यासाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.५३ वाजता सुटणार आहे.