नरेश म्हस्के आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली

Santosh Gaikwad June 08, 2024 06:43 PM

 
मुंबई, दि. ८ः 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत (ठाकरे) घरवापसीची चर्चा रंगली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेचे खंडन करताना, ठाकरेंचेच दोन खासदार संपर्कात असल्याचा दावा केला. शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के मंत्रिपदासाठी हुजरेगिरी किंवा लांगुलचालन करत असल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. खासदार म्हस्के आणि अंधारेंमध्ये यामुळे वार रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ७ जागा मिळाल्या. शिवसेनेला (ठाकरे) ९ जागांवर विजय मिळाला. आता पुन्हा खासदारांचा घोडेबाजार सुरू होतो की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निवडून आलेल्या खासदारांवरून दोन्हीकडून हेवेदावे केले जात आहेत. लोकसभेतील अपयशामुळे सेनेचे काही आमदार पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत आहेत, असा दावा अंधारे यांनी केला होता. नवनिर्वाचित खासदार म्हस्के यांनी या दाव्यावर प्रत्युत्तर देताना, ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. मतदारसंघात विकासकामे व्हावी, हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे वारंवार सांगत आहेत. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मते मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांचे म्हणणे आहे. परंतु, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होईल का, असा प्लॅन ही त्यांनी आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे आहे, असा खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला. या दाव्याला अंधारे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिली.


म्हस्के यांनी त्या दोन खासदारांची नावे जाहीर करावीत. काहीही विधाने करणे, खासदार असलेल्या माणसाला शोभत नाहीत. परंतु, म्हस्के यांना खासदार झाल्याचा विसर पडला असावा. त्यामुळे ते काहीही बरळतात, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला. तसेच पैशाच्या जोरावर म्हस्के यांनी खासदारकी विकत घेतली. त्यांच्यावर गांभीर्याने बोलण्याची गरज नाही. केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी म्हस्के यांनी हुजरेगिरी, लांगुलचालन आणि आगाऊपणा करत आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुलाशिवाय, कोणाकडे ही बघणार नाहीत, असा सूचक इशारा देत, टीकास्त्र सोडले.  दहा पक्ष बदलण्याच्या तयारी असलेल्या म्हस्केनी मुख्यमंत्र्यांच्या वसुलीची कामे केल्याने खासदार झाले, असा घणाघाती हल्लाबोल चढवला.