SHIVNER NEWS
MUMBAI : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष गटात फिडे गुणांकित बुध्दिबळपटू स्वरूप सावळकरने तर महिला गटात चारुशीला नाईकने विजेतेपद पटकाविले. द्वितीय मानांकित स्वरूप सावळकर विरुध्द प्रथम मानांकित तमोजीत चक्रबर्ती यामधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत प्रारंभी डावपेच निकाली होण्याच्या शक्यतेने रंगले. परंतु दोघांनी एकमेकाचा अंदाज घेत अकराव्या मिनिटाला डाव बरोबरीत सोडविला. परिणामी सरस सरासरीच्या बळावर स्वरूप सावळकरने (४.५ गुण) प्रथम क्रमांकावर झेप घेतली. तमोजीत चक्रबर्तीला (४.५ गुण) द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदाचे अधिकारी प्रदीप सुरोशे, फिडे आर्बिटर सिध्देश थिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने बेलार्ड पियर येथे झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेतील महिलांची निर्णायक साखळी चौथी फेरी चुरशीची झाली. शेवटी चारुशीला नाईकने (४ गुण) राणीच्या सहाय्याने मनीषा राणेच्या (३ गुण) राजावर करून विजेतेपद सहज हासील केले. पुरुष गटात तृतीय स्थानासाठी ओ. वेंकटेश (४ गुण), कुंवरसिंग (४ गुण), तेजस पाल्ढे (४ गुण) यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली. त्यामध्ये उत्तम सरासरीच्या बळावर वेंकटेशने बाजी मारली. राष्ट्रीय स्तरावर ११ नोव्हेंबरपासून पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय बीओबी बुध्दिबळ स्पर्धेमध्ये स्वरूप सावळकर, तमोजीत चक्रबर्ती, चारुशीला नाईक, मनीषा राणे आदी बुध्दिबळपटू बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बुध्दिबळ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.