मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व रुग्णालयीन क्रिकेटपटू यांच्यातर्फे क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेप्रसंगी आयडियलचे सल्लागार व क्रिकेट संघटक अभय हडप यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शिवाजी पार्क मैदानात गौरव केला. गेली अनेक वर्षे सातत्याने होणाऱ्या आयडियल आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेसाठी संघटक अभय हडप यांचे सेवाभावी मार्गदर्शन लाभत असून स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी मोलाचे ठरत आहे. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सिल मेम्बर देखील आहेत. यावेळी त्यांनी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सातत्यपूर्ण क्रीडा कार्याचे कौतुक करीत एमसीएतर्फे आंतर रुग्णालयीन क्रिकेटसाठी होत असलेल्या कार्याची माहिती दिली.
स्व. दिलीप करंगुटकर स्मृती आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेची केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई विरुद्ध ग्लोबल हॉस्पिटल यामधील साखळी अ गटाची लढत ६ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वा. शिवाजी पार्क मैदानात रंगणार आहे. केडीए हॉस्पिटलसाठी ही स्पर्धेमधील अस्तित्वाची लढत असल्यामुळे कप्तान संदीप देशमुख विरुद्ध ग्लोबल हॉस्पिटलचे कप्तान महेश गोविलकर यांच्यामधील डावपेचांनी हा सामना रंगेल. त्यानंतर दुसरी लढत कस्तुरबा हॉस्पिटल विरुद्ध रहेजा हॉस्पिटल यामध्ये होईल. बाद फेरीतील संभाव्य स्थानाची अर्धी लढाई कस्तुरबा हॉस्पिटलने अष्टपैलू अंकुश जाधव, महेश सणगर यांच्या खेळामुळे जिंकली आहे. कप्तान अविनाश डांगळे यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेचे सत्कारमूर्ती चेतन सुर्वे तसेच सचिंद्र ठाकूर आदी खेळाडूंचा रहेजा हॉस्पिटल संघ समतोल असून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला काटेरी टक्कर देण्याच्या तयारीत आहे.