ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै .विजय चौधरी करणार जागतिक पोलीस व फायर गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व; छोट्याशा गावातून येऊन केलेली कामगिरी अभिमानस्पद
Santosh Sakpal
July 22, 2023 09:31 PM

मुंबई दि. २२ - सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै .विजय चौधरी हे आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धा २८ जुलै ते ०६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत.
चौधरी यांनी २०१४,२०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी पोलीस खेळांमध्ये ते १२५ किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी पै .रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. यावेळी बोलताना कोच रोहित पटेल यांनी सांगितले कि, या स्पर्धेसाठी बरीच वर्षे आम्ही मेहनत घेत आहोत. विजय नक्कीच यश मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल.
स्पर्धेच्या तयारीबाबत चौधरी म्हणाले, “ आगामी स्पर्धेत कॅनडा, रशिया, अमेरिका, चीन इत्यादि. देशांच्या कुस्तीपटूंचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. या प्रशिक्षणासाठी मला महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कॅनाडियन टाईम झोन नुसार त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.
मागील वर्षी २०२२ साली पुण्याच्या वानवडी येथील एस आर पी एफ ग्राऊंड मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलिस गेम्स स्पर्धेत चौधरी यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करत असताना सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नावलौकिक केले होते. आता येणारी स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असून जागतिक पोलिसांसाठी ऑलिंपिक च्या दर्जाची मानली जाते. आजवर केलेल्या कामगिरीपेक्षाही अधिक चांगली कामगिरी या स्पर्धेत करण्याचा मानस चौधरी यांनी व्यक्त केला आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी विजय नथू चौधरी यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले आहे.
Santosh Sakpal
April 01, 2025
Santosh Sakpal
March 31, 2025
Santosh Sakpal
March 31, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023