मुंबई दि. २७ - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवलयाने नियमानुसारच रद्द केली आहे. त्यांनी वेळोवेळी खालच्या स्तराचे निराधार आरोपांचे नाकरात्मक राजकारण केले आहे. त्यांनी मोदी या ओबीसी समाजातील आडनावाचा उल्लेख वाईट करून ओबीसींचा अपमान केला आहे. या प्रकरणी माफी मागण्यास नकार देणाऱ्या राहुल गांधींची मागासवर्गीय समाजाबद्दलची जातीवादी मनोवृत्ती उघड झाली आहे. त्यामुळे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिक्षा योग्यच असून आगामी सार्वत्रिक निवडणुकीत जनता राहुल गांधींना दारुण पराभवाचा धडा शिकवेल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत बांद्रा येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले.
राहुल गांधी यांना मोदी आडनावाचा चोर म्हणून उल्लेख केल्या प्रकरणी सुरत कोर्टाने दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.या प्रकरणाची दखल घेऊन लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी नियमानुसार रद्द केली आहे. यात भाजप चा काहीही संबंध नाही असे .रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरणी आरोपबाजीचा मोठा धुरळा उडविला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कोणताही घोटाळा झाला नसल्याची क्लीन चिट दिल्यामूळे आरोप करणारे राहुल गांधी तोंडघशी पडले. राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, हा अत्यंत नाकरात्मक घृणास्पद आरोप करीत केलेल्या प्रचारावर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींवर ताशेरे ओढले आहेत. त्यांना कोर्टात या प्रकरणी माफी मागावी लागली आहे. राहुल गांधी यांचे राजकारण अत्यंत नाकरात्मक जातीवादी आणि घृणा द्वेष करणारे राजकारण आहे. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है प्रचाराला त्यांच्याच काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा नव्हता. चौकीदार चोर है चा प्रचार करीत लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या राहुल गांधी यांना अमेठी मध्ये लोकांनी पराभवाची धूळ चारली आणि संपूर्ण देशात काँग्रेस चा पराभव झाला. त्यातून राहुल गांधी यांनी कोणताही धडा घेतला नाही. ते सतत बिनबुडाचे आरोप करीत आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आता जनताच त्यांना पराभवाचा धडा शिकवेल असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.